राज्यातील पोलीस पाटलांचे प्रश्न, सोमनाथ वैद्य यांनी मांडले गृहमंत्र्यांसमोर ; या केल्या महत्वाच्या मागण्या
सोलापूर : पोलीस पाटलांचे मानधन व इतर सोयीसुविधा नियमितपणे मिळाव्यात या मागणीचे निवेदन स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिले आहे.
यावेळी सोमनाथ वैद्य यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पोलीस पाटलांच्या विविध प्रश्न आणि मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली.दक्षिण सोलापूर मतदार संघामध्ये ५० पेक्षा जास्त पोलीस पाटलांची संख्या असून त्यांचे वेतन गेल्या ४ महिन्यांपासून प्रलंबित आहे. पोलीस पाटील हा गावातील अतिशय महत्वाचा घटक असून तो गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिवस रात्र काम करीत असतो.
गावातील कोणतीही गुन्हेगारी कृती झाली की स्थानिक पोलीस हे पोलीस पाटलांच्या घरी येऊन ते पहिली प्राथमिक माहिती घेत असतात. असे हे पोलीस पाटील हे अत्यंत कमी मानधनामध्ये काम करीत आहेत. त्यांना मिळणारे मानधन व भत्ते व इतर सोयी-सुविधा नियमित मिळावे याकरिता त्यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे. पोलीस पाटीलांना मिळणारे मानधन नियमित मिळावे व अतिरिक्त भत्ते देण्याबाबत प्रस्ताव सोलापूर पोलीस अधीक्षक यांच्याकडून तात्काळ शासनाकडे मागविण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.