दक्षिणमध्ये झाला या पाटलांचा उदय ; बापूंना टेन्शन की बोलावता धनी वेगळाच ? अयो ! पाचशे गाड्या घेऊन जाणार म्हणे..
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेस पक्षातून विशेष करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांची सर्वाधिक संख्या समोर आली आहे. एकीकडे काँग्रेसकडे इच्छुक वाढत असताना दुसरीकडे आता भारतीय जनता पार्टी मधून सुद्धा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांमधूनच इच्छुक वाढत असल्याने बापूंच्या टेन्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लिंगायत समाजातील नेते आप्पासाहेब पाटील हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून इच्छुक झाल्याने त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. यामुळे दक्षिण मध्ये आणखी एका पाटलाचा उदय झाल्याचे दिसत आहे.
लिंगायत समाजातील भारतीय जनता पार्टी मधील उदय पाटील हे सुद्धा दक्षिण सोलापूर मधून इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे परंतु उदय पाटील हे मोर्चेबांधणी करताना कुठेही दिसत नाहीत असे असताना आता आप्पासाहेब पाटील हे इच्छुक झाल्याने त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.
दक्षिणचे दोन टर्म नेतृत्व करणारे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात त्यांचेच नगरसेवक इच्छुक झाले आहेत. यामध्ये माजी महापौर राजेश काळे, माजी सभापती मेनका राठोड आणि आता आप्पासाहेब पाटील यामुळे भाजपमध्ये सुद्धा डोकेदुखी वाढणार आहे.
तसे पाहायला गेले तर आप्पासाहेब पाटील हे मूळचे माजी आमदार दिलीप माने यांचे कट्टर समर्थक पण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी दिलीप माने यांचा हात सोडून त्या वेळचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना जाऊन मिळाले आणि बाजार समितीची निवडणूक लढवली. विरोधात असलेल्या काँग्रेसने सुरेश हसापुरे यांचा त्यावेळी त्यांनी पराभव केला. दक्षिण विधानसभा मतदारसंघात हसापूरचे विरोधक म्हणून आप्पासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी आप्पासाहेब पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुद्धा हसापुरे यांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी हसापुरे यांनी त्यांना भीमाची वाळू चारली होती.
आप्पासाहेब पाटील हे सुमारे पाचशे गाड्यांचा ताफा घेऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार अशा वावड्या उठू लागल्या आहेत. त्यांनी दक्षिण मधील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून काँग्रेसचे लिंगायत समाजातील नेते विजयकुमार हत्तुरे यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. खरेच आप्पासाहेब पाटील हे निवडणूक लढवणार का? लिंगायत समाजातून भाजप कडून उदय पाटील यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने आप्पासाहेब पाटील यांच्या खांद्यावरून दुसराच नेता निशाणा तर मारत नाही ना असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून ऐनवेळी अप्पूचा पप्पू होऊ नये म्हणजे झाले बाबा.