सोलापूर,(प्रतिनिधी):- सोलापूर मध्ये होत असलेल्या 100 व्या नाट्य संमेलनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सक्रिय सहभाग राहिल असे प्रतिपादन कुलगुरू अशोक महानवर यांनी केले.
100 व्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या मंडप उभारणीचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते मंगळवार दि. 16 जानेवारी रोजी नार्थकोट मैदानावर करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मनपा उपायुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, भारतीय जनता पक्षाचे शहाजी पवार, अविनाश महागांवकर, मोहन डांगरे, अमोल शिंदे, विनोद भोसले, नाट्यसंमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे, स्वागत समितीचे प्रशांत बडवे, समन्वयक कृष्णा हिरेमठ, रंगमंच समितीचे जितेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर ही नाट्य चळवळीची नगरी असून यंदाच्या वर्षी होत असलेल्या 100 व्या विभागिय नाट्य संमेलन आयोजनाची मोठी आणि एैतिहासिक जबाबदारी सोलापूरच्या नाट्य रसिकांवर आलेली आहे. ती यशस्वीपणे पार पाडणार यामध्ये कोणतीच शंका नाही सर्वांनी मिळून हे शिवधनुष्य उचलायचे आहे त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचाही सक्रिय सहभाग राहणार आहे सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात काही कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू महानवर यांनी सांगितले.
प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे यांनी सोलापूरला नाट्यसंमेलन कसे मिळाले याबाबतची माहिती दिली. यापुर्वी 88 वे नाट्यसंमेलन कसे यशस्वीपणे पार पाडण्यात आले. त्यानंतर बालनाट्य पहिल्यांदाच कसे यशस्वीपणे पार पाडले, याच्या जोरावरच सोलापूरला 100 वे नाट्य संमेलन आयोजित करण्याची संधी मिळाली असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर या नाट्य संमेलनाचे विशेष मार्गदर्शक प्रा.शिवाजी सावंत यांनी नाट्य संमेलनाला येणाऱ्या प्रत्येकाच्या भोजनाची जबाबदारी पार पाडणार असल्याची ग्वाही दिली.
नंतर मनपा उपायुक्त संदीप कारंजे आणि पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सर्वपरिने सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भूमीपूजन सोहळा पार पाडण्यात आला.
शेवटी नाट्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी सांगितले की 88 व्या नाट्यसंमेलनाप्रमाणेच 100 व्या नाट्यसंमेलन यशस्वी करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचेही प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी नाट्यसंमेलन स्वागत समितीचे प्रशांत बडवे यांनी भुमीपूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले, लोंढे यांच्यासह अनेक मान्यंवर उपस्थित होते.