भाजपच्या माजी नगरसेविका मेनका राठोड व त्यांचे पती निर्दोष ; काय होते नेमके प्रकरण
सोलापूर :- सोलापूर येथील रहिवासी भा.ज.पा. च्या माजी नगरसेविका मेनका राठोड, तसेच त्यांचे पती मंडल अधिकारी शिवराज राठोड यांनी अशोक कनीराम चव्हाण यांचे खंडणीसाठी अपहरण करुन त्यांना मारहाण केल्या प्रकरणीच्या खटल्यात सोलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्रीमती. आय.ए. शेख/नाझीर यांनी निर्दोष मुक्तता केली.
याची थोडक्यात हकीकत अशी की, दि.०४/०७/२०१८ रोजी फिर्यादी चव्हाण हे त्यांचे राहते घरी असताना रवी जाधव, दिपक राठोड, संजय पवार हे मोटार सायकल वरुन त्यांच्या घरी आले, त्यांनी फिर्यादी यांना मेनका राठोड यांनी बोलवले आहे असे सांगुन आलेल्या इसमांनी फिर्यादीस जबरदस्तीने मोटार सायकलीवर व पुढे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पीओ मध्ये बसवून त्यांचे अपहरण करुन जबरदस्तीने त्यांना मेनका राठोड यांच्या घरात आणले, त्यावेळी मेनका राठोड यांनी फिर्यादीस स्टंपने मारहाण केली, त्यावेळी शिवराज राठोड यांनी देखील फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली, त्यावेळी इतर तीन इसमांनी फिर्यादीस पकडुन ठेवले तसेच त्यावेळी शिवराज राठोड यांनी फिर्यादीस “तु विरुध्द पक्षाच्या मार्केट कमीटी निवडणुकीमध्ये प्रचार केल्याने माझी पत्नी निवडणुकीमध्ये पडली, व त्यात आमचे वीस लाख रुपये खर्च होऊन, आमचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे तु आठ दिवसांत दहा लाख रुपये आणुन दे नाहीतर तुझ्या पुर्ण परिवारास खलास करतो” अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीस मारहाण करीत असताना फिर्यादीची सोन्याची चैन खाली पडली ती इतर इसमांनी उचलुन त्यांचे खिशात ठेवली अशा आशयाची फिर्याद त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
त्यामुळे एकूण ५ आरोपी विरुध्द विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणी पोलीसांनी तपास करुन आरोपी विरुध्द सत्र न्यायालयामध्ये दोषारोप पत्र पाठविले होते. सदर खटल्याची सुनावणी होऊन त्यामध्ये सरकारपक्षातर्फे एकूण ८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. त्यामध्ये आरोपीचे वकील अॅड. शशि कुलकर्णी यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती मे. कोर्टाच्या निर्दशनास आणून देऊन त्या अनुषंगाने आरोपींना निर्दोष मुक्तता करणेचा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद विचारात घेऊन मे. कोर्टाने सर्व पाचही आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
प्रकरणात माजी नगरसेविका मेनका राठोड व मंडल अधिकारी शिवराज राठोड यांच्यातर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅड. प्रणव उपाध्ये तर इतर आरोपींच्या वतीने अॅड.ए.एन. शेख व सरकारतर्फे अॅड. गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले.