सोलापुरात प्रथमच महिला सावकार विरुद्ध गुन्हा दाखल ; जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांचा दणका
सोलापूर : सोलापुरात पहिल्यांदाच एका महिला सावकार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. उर्मिला आण्णासाहेब राठोड राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या महिला सावकारचे नाव आहे.
जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, दत्तात्रय भवर यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पी.आर.संकद, सहाय्यक अण्णप्पा कोळी, सहाय्यक विक्रम गौड, सहाय्यक अनिल मदने यांच्या पथकाने अर्जदार अंजना दत्तात्रय कोळी व दत्तात्रय लक्ष्मण कोळी यांचे तक्रार अर्जानुसार ही कारवाई केली .
मौजे कोंडी ता. उत्तर सोलापूर येथे अवैध सावकारी व्यवसाय करणा-या उर्मिला आण्णासाहेब राठोड रा. कोंडी येथे ३१ जानेवारी २०२४ रोजी घर झडती घेऊन अवैध सावकारीच्या अनुषंगाने त्यांचे घरामध्ये विविध व्यक्तिंच्या सहया असलेले कोरे चेक, तक्रारदार यांनी लिहुन दिलेले रु. १०० चे स्टॅप पेपर, व्याजाच्या नोंदी असलेले नोंद वहया इत्यादी दस्तऐवज आढळुन आल्या.
उर्मिला आण्णासाहेब राठोड या वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39 व 41 (ग) अन्वये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 01 फेब्रुवारी 2024 रोजी पी. आर. संकद, मुख्य लिपीक यांनी शासकीय फिर्याद दाखल केलेली आहे.