सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार
सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वळसंग गटामध्ये बाजार समितीचे संचालक रामपा चिवडशेट्टी हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत.
त्यांचे जावई महेश बिराजदार यांनी भारतीय जनता पार्टी कडूनच वळसंग गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण पक्षाने त्यांचे सासरे चिवडशेट्टी यांना एबी फॉर्म दिल्याने ते अपक्ष झाले होते.
मंगळवारी महेश बिराजदार हे आपली पत्नी शिल्पा चिवडशेट्टी बिराजदार यांच्यासोबत निवडणूक कार्यालयात आले त्यांनी आपला वळसंग गटातून उमेदवारी अर्ज मागे घेतला.
दरम्यान शिल्पा चिवडशेट्टी यांनीही कुंभारी गटातून भाजप तर्फे उमेदवारी दाखल केली होती. पण दुसरीकडे त्यांच्या वडिलांना वळसंग मधून भाजपने उमेदवारी दिल्याने त्यांनी कुंभारी गटातील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला मात्र त्यांना धोत्री गणातून भाजपने उमेदवारी दिली आहे ती त्यांनी कायम ठेवली.
शिल्पा चिवड शेट्टी यांनी कुंभारी गणातून माघार घेतल्यानंतर शिंदे शिवसेनेचे उमेदवार रोहित दीपक बिराजदार यांनी महेश बिराजदार यांचे आभार व्यक्त केले.
दुसरीकडे मंद्रूप जिल्हा परिषद गटात माजी जिल्हा परिषद सदस्य विद्युलता प्रभाकर कोरे आणि त्यांची कन्या प्रीती प्रभाकर कोरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामध्ये प्रीती कोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म दिल्याने आपल्या मुलीसाठी आई विद्युलता कोरे यांनी माघार घेतली आहे. मंद्रूप पंचायत समिती गणात त्यांचे चुलते आप्पासाहेब कोरे हे सुद्धा उमेदवार आहेत.



















