शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करा ; सोलापुरात काँग्रेसची मागणी
सोलापूर : अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार सरसकट मदत व सोलापूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीप्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनोद भोसले यांनी केली आहे.
गुरुवारी विनोद भोसले यांच्यासह युवक अध्यक्ष गणेश डोंगरे भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना निवेदन दिले.
सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळ जवळ सर्व महसूल मंडळामध्ये अवर्षणग्रस्त परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे आतोनात असे नुकसान झाले असून आपण शासन दरबारी प्रस्ताव पाठवून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी रु. ५० हजार इतकी मदत करावी व ज्यांची जनावरे यात वाहून गेली असतील व मृत्य पावली असतील तसेच काही घरांची पडजड झाली असून त्या घरांचे कायमस्वरुपी नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा करुन पुनर्वसन करुन योग्य तो कायमस्वरुपी निवारा मिळावा अश्या पध्दतीची योग्य ती मदत करावी.
या पावसामुळे सध्या शेतामध्ये असलेले पिकांचे तर नुकसान झाले आहे. परंतु येणाऱ्या काळातही रबी पिकेही हातात येण्याची शक्यता नाही. यामुळे आपला जिल्हा ओलादुष्काळ जाहिर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.