सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर या ठिकाणी पक्षाचे 139 व्या स्थापना दिनानिमित्त महा अधिवेशन घेऊन एक प्रकारे शक्तिप्रदर्शन केले.
सोलापुरातून हजारों कार्यकर्ते या अधिवेशनाला उपस्थित होते. या महारॅली पूर्वी सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक काँग्रेस भवन या ठिकाणी घेतली होती. त्यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अश्फाक बलोरगी, भीमराव बाळगे, रमेश हसापुरे, मल्लेशी बिडवे, राधाकृष्ण पाटील, भीमाशंकर जमादार, मोतीराम चव्हाण असे अनेक पदाधिकारी नेते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये नागपूर येथे होणाऱ्या महा रॅलीसाठी दहा हजार कार्यकर्ते जिल्ह्यातून नेण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांनी केला होता. स्वतः जिल्हाध्यक्षांसह त्यांचे समर्थक कोणीही या महारॅलीला उपस्थित राहिले नाहीत. हे सर्व जिल्हाध्यक्षांच्या अकलूज मध्ये आवर्जून उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे पक्षाच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला कोणीही गेले नाही.
उलट जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्ते नागपूरला नेले. सोलापुरातून गेलेल्या ट्रॅव्हल्सचा बऱ्यापैकी खर्च सुद्धा हसापुरे यांनीच केल्याची माहिती कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळाली. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे हे ज्या बस मधून कार्यक्रम स्थळी निघाले. त्या बस मध्ये सुरेश हसापुरे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना स्वतः शिंदे यांनी बोलावून सोबत नेले. एवढेच नाही तर मुख्य स्टेजवर सुद्धा सुरेश हसापुरे व चेतन नरोटे यांना बसण्याची संधी मिळाली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी आपली उमेदवारी यापूर्वीच घोषित केले आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी सुद्धा उमेदवार द्यायचा कोण ? या विचारात पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसला चांगले वातावरण असताना दुसरीकडे जिल्हा काँग्रेस मात्र कुठेही दिसत नाही. याची निश्चितच वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे असा सूर आता काँग्रेस कार्यकर्त्यांमधून उपस्थित होऊ लागला आहे.