दिलीप मानेंच्या निवासस्थानी सहकार मंत्र्यांनी घेतला ‘प्युवर व्हेज’चा आस्वाद ; राजन पाटील, दीपक साळुंखे मानेंच्या बंगल्यावर
सोलापूर : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सोलापूर चर्चेचा विषय ठरला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस पक्षात आलेल्या दिलीप माने यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार मंत्री पाटील यांनी दुपारचे भोजन घेतले. मालकांनी सहकार मंत्र्यांचे अतिशय मनोभावे स्वागत केले, यावेळी पृथ्वीराज माने व कार्यकर्त्यांनी पाहुण्यांचे चांगलेच आदिरातिथ्य केल्याचे पाहायला मिळाले.
सहकार मंत्री पाटील यांच्या सोबतच दिलीप माने यांच्या बंगल्यावर अजित पवारांचे घड्याळ काढून शिवसेनेची मशाल हाती घेतलेले दीपक साळुंखे पाटील हे आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष पवार, माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी गटनेते किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, आनंद मुस्तारे या सर्वांनी एकत्रित रीत्या दिलीप माने यांच्या सुमित्रा निवासस्थानी प्युअर व्हेजचा आस्वाद घेतला.
काही वेळाने माजी आमदार राजन पाटील यांच्या आगमन झाले ते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे शेजारी बसले. माने यांनी त्यांना जेवणाचा आग्रह केला मात्र मी अगोदरच जेवून आलोय तुमच्या या गेटमध्ये काय असतं हे मला माहिती असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला अन् त्यांनी स्वीट डिश टेस्ट केली.
जेवणानंतर राजन पाटील आणि दीपक साळुंखे या दोघांना माने यांनी सहकार मंत्र्यांसोबत आपल्या बंगल्यात नेले. बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला साखर सहसंचालकाकडून वसुलीच्या नोटीसा मिळाल्या आहेत. राजन पाटील आणि दीपक साळुंखे हे जिल्हा बँकेचे माजी संचालक आहेत या दोन्ही नेत्यांच्या हातामध्ये आत मध्ये जाताना कागद पत्र दिसून आले.