राम सातपुते यांच्या विजयात धनगर समाजाचा महत्त्वाचा वाटा असेल ; सोलापुरात कुणी केला हा दावा
सोलापूर : संपूर्ण देशाचे लक्ष चार जून कडे लागले आहे लोकसभा निवडणूक होऊन मतदान पार पडले आता कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांना आहे सोलापुरात भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे होत्या अतिशय अटीतटीची ही लढत झालेली आहे त्यामुळे या दोन्ही तरुण आमदारांमध्ये विजयी कोण होणार याबाबत आता पैजा ही लागल्या आहेत.
या लोकसभा निवडणुकीत अनेक सामाजिक समीकरणे पाहायला मिळाली. त्यामध्ये मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, आंबेडकरी समाज असेल, लिंगायत समाज असेल, पद्मशाली समाज असेल, विशेष म्हणजे धनगर समाज ही सोलापूर लोकसभेसाठी निर्णायक मते आहेत. या निवडणुकीत मुस्लिम समाज, मराठा समाज, पद्मशाली समाज यांनी कुणाला मतदान केले हे स्पष्ट पाहायला मिळते परंतु सुमारे तीन ते चार लाखाचा मतदार असलेला धनगर समाज याबाबत अंदाज कुणाचाही सांगता आलेला नाही.
दरम्यान धनगर समाजाचे कार्यकर्ते अमोल कारंडे यांनी मात्र या लोकसभा निवडणुकीत सोलापुरात धनगर समाजाची मते निश्चित निर्णायक ठरतील असा दावा करत भाजपचे आमदार राम सातपुते हेच विजयी होतील असे सांगितले आहे. असे सांगताना त्यांनी या मागील स्पष्टीकरण सुद्धा दिले.
भाजप उमेदवार सातपुते यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर तालुका, मोहोळ तालुका, अक्कलकोट तालुका या ठिकाणी धनगर समाजाच्या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून बैठका घेण्यात आल्या व दक्षिण तालुक्यातील हत्तुर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांची जाहीर सभा प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली.
महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा असताना धनगर समाजाला भाजपा सोडून कोणीही लोकसभेला उमेदवारी दिली नाही परभणी मध्ये माजी मंत्री महादेव जानकर यांना भाजपा युतीने लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे धनगर समाज जास्तीत जास्त संख्येने भाजपाच्या सोबत राहिला असा त्यांनी दावा केला आहे.