देवेंद्र फडणवीस यांच्यावरील बिनबुडाचे आरोप मान्य नाहीत ; आशिष शेलार यांनी जरांगे पाटलांना घेतले फैलावर
मुंबई, : मराठा समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावे, या भूमिकेचे भारतीय जनता पार्टीने समर्थनच केले आहे. समाजाने केलेल्या आंदोलनामध्ये अथवा कायदा करताना मराठा समाजाला अधिकचे मिळावे, या त्यांच्या मागणीला सभागृहामध्ये मी स्वतः आणि आम्ही सगळ्यांनी समर्थन दिले आहे. म्हणून समाज जी मागणी मागतो आहे, त्याला पूर्ण करण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. या कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण करण्याचं काम मनोज जरांगे यांनी सुद्धा हे मान्य केले होते.
मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच टिकणारे आरक्षण दिले होते. मराठा समाजाला न्यायिक, टिकणारे आरक्षण देणाऱ्या देवेंद्रजींवर असे बिन बुडाचे आरोप करणे, हे आम्हाला मान्य नाही. ते असमर्थनीय आहेत.
मराठा समाजाला न्याय आपण मिळवून देऊ हीच भूमिका सरकारने घेतली आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांशी जी शपथ घेतली त्याप्रमाणे आता दहा टक्के आरक्षण दिले आहे. समाजाचे अन्य जे विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित विषय सुद्धा चर्चेतून सोडवले जाऊ शकतात आणि सोडवले पाहिजेत.
या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारे राजकीय रंग देणे हे मराठा समाजाला मान्य नाही. मराठा समाज राजकारण विरहित राहून समाजाला न्याय मिळण्याच्या भूमिकेवरच काम करतो आहे. आणि म्हणून याबाबतीत राजकारण करता कामा नये हीच समाजाची भूमिका आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐकेरी उल्लेख झाला त्याचे समर्थनच होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोलले पाहिजे, देवेंद्रजींचा आजपर्यंतचा राजकीय इतिहास हा कुठे गैर पद्धतीने वितुष्ट निर्माण करणारा नाही. संविधान आणि कायदा याच्या पलीकडे कधी ते बोलतच नाहीत. म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे करण्यात आलेले बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो.
मुळामध्ये राजकारण राजकीय पक्षाने खेळावं, कोणत्याही राजकीय पक्षाने हा प्रयत्न करू नये की, अशा पद्धतीने समाजामध्ये वितृष्ठ निर्माण होईल, आणि म्हणून या सगळ्यात राजकीय वास येण्याची स्थिती का निर्माण झाली ? याचा विचार मराठा समाज नक्की करतो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ज्यांनी आतापर्यंत टिकणार आरक्षण मुख्यमंत्री पदाच्या काळात दिलं, ज्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर आणि मा. उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर दहा टक्क्याचा आरक्षण दिले, तसेच गृहमंत्री म्हणून सुद्धा आपली जबाबदारी योग्य पध्दतीने बजावत आहेत, त्यांच्यावर आरोप करणे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. आम्ही ते फेटाळतो. याच्यात राजकारण जर कोणी करू पाहत असेल, तर त्याचा राजकीय सामना करायला आम्ही समर्थ आहोत, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.