क्या बात है गायकवाड साहेब ! या कुटुंबाच्या जीवनात आणला तुम्ही आशेचा ‘ किरण’
सोलापूर : सहकार क्षेत्रातील विकास सोसायट्यांच्या मयत झालेल्या गट सचिवांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा थकीत पगाराचा प्रश्न सोडवून त्यांना आर्थिक लाभ मिळवून दिल्याबद्दल सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांचे त्या मयत गट सचिव कुटूबीयांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत. मयत झालेल्या अकरा गट सचिव्यांच्या कुटुंबीयांना उपनिबंधक गायकवाड यांच्या प्रयत्नातून मोठा आर्थिक लाभ मिळाल्याने त्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
मयत झालेले बाबासाहेब शंकरराव शिंदे, ता. पंढरपूर 41 महिन्यांचे 10,83,750 वेतन, सुधिर कोंडीबा तवले, ता. बार्शी यांचे 25 महिन्यांचे 7,85,122 वेतन, शशिकांत गिरीधर पाटील, रा. बार्शी यांचे दोन महिन्यांचे 49,738 वेतन व गिरीश भागवत सावळे, रा. बार्शी यांचे 28 महिन्यांचे 7,87,523 वेतन थांबले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना कोणताही आर्थिक लाभ मिळत नव्हता.
दरम्यान मयत गटसचिवांची कुटूंबे हे त्या मयत सचिवाचा मृत्यू दिनांकापर्यंत थकीत पगार न झाल्यामुळे मृत्यूपश्चात मिळणाऱ्या पुढील सर्व आर्थिक लाभापासून वंचित होती. हया सर्व मयत सचिवांच्या कुटूंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन जिल्हा देखरेख सहकारी संस्थेने आज रोजी 04 मयत सचिवांचा थकीत पगार एकूण रक्कम रुपये 27,06,133 स्वनिधीतून भरुन हया मयत सचिवांच्या कुटूंबाना सचिवाच्या मृत्यूपश्चात मिळणाऱ्या सर्व आर्थिक लाभासाठी वाट मोकळी करुन देण्याचा निर्णय, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व प्रशासक, उमेश पवार, सहाय्यक निबंधक यांनी घेतल्यामुळे एक आनंदाचे वातावरण सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिवांमध्ये निर्माण झाले आहे.
यापूर्वीही अशाच प्रकारे 07 मयत गट सचिवांच्या कुटूंबाना थकीत पगाराची रक्कम अदा करुन त्यांना पुढील लाभ मिळवून दिले आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक, सोलापूर व संस्था केडरचे प्रशासक यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या निर्णयासाठी सर्व गट सचिव संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.