क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी सोलापुरात अंगणवाडीच्या चिमुकल्यांसोबत खाल्ली खिचडी !
सोलापूर : भारताचा स्टार फलंदाज म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या अजिंक्य रहाणे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावातील अंगणवाडी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अंगणवाडीतील तयार होणारी खिचडी टेस्ट करीत चिमुकल्या सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
अर्थ फिट या सामाजिक संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम पाहण्यासाठी अजिंक्य रहाणे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या ठिकाणी त्यांनी गाव फिरताना जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी तसेच इतर ग्रामपंचायत या ठिकाणी भेटी देत त्या ठिकाणी पाहणी केली.
अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या खिचडी किचनला त्यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांची खिचडी त्यांनी टेस्ट केली. नंतर मुलांमध्ये बसून गप्पा मारल्या.
भारतीय क्रिकेटर अजिंक्य रहाणे हे वडापूर गावांमध्ये आले असल्याची माहिती पंचक्रोशीत कळल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी विशेष करून क्रिकेट प्रेमी युवकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.