माझी लढत भाजपशीच ; ‘एमआयएम’ला मी जुमानत नाही ; आडम मास्तर यांनी दाखल केला अर्ज
सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांनी सर्वात प्रथम शहर मध्य या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुपारच्या सुमारास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मोठी रॅली काढण्यात येणार आहे त्यापूर्वीच मास्तर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी एम एच शेख, अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, बापू साबळे, सनी शेट्टी यांची उपस्थिती होती.
यानंतर प्रतिक्रिया देताना मास्तर म्हणाले, मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून माझा अर्ज दाखल केला आहे मंगळवारी महाविकास आघाडी कडून माझी अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त करताना जरी काँग्रेसला उमेदवारी मिळाली तर या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असेही ते म्हणाले.
दरम्यान माझा प्रमुख विरोधक हा भाजप असून एमआयएम या पक्षाला मी जुमानत नाही, भाजपचा उमेदवार जरी पद्मशाली असला तरी मी स्वतः पद्मशाली समाजाचा आहे हजारो कार्यकर्ते आहेत, समाजाच्या लोकांसाठी मी अनेक वर्षे कामे केले आहेत त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही असेही मास्तर म्हणाले.