काँग्रेसच्या ‘शरद’ने भाजपच्या देशमुख यांना विचारले ; “माझे श्रेय तुम्ही का घेता” ; सोलापुरात आता नवा श्रेयवाद
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री रूपा भवानी देवस्थानच्या यात्री निवासासाठी शासनाच्या पर्यटन विभागाकडून मंजूर झालेल्या पाच कोटी निधीवरून आता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद रंगण्याची चिन्ह आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांना काँग्रेसचा कार्यकर्ता शरद गुमटे यांनी “माझे श्रेय तुम्ही का घेता? असा प्रश्न विचारला आहे.
महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत सोलापूर शहराची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिर येथे भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यास कार्यान्वित यंत्रणेस शासन आदेश झाला आहे.
भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाल्याचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून बातम्या देण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी काँग्रेस पक्षातील लिंगायत समाजाचा कार्यकर्ता शरद गोमटे यांनी रूपाभवानी देवस्थानच्या यात्री निवासासाठी 2019 या सालापासून प्रयत्न आणि पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे.
शरद गुमटे यांनी 11 फेब्रुवारी 2019 रोजी त्यावेळच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या पत्रावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याविषयी निवेदन दिले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 14 फेब्रुवारी 2019 रोजी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना गुमटे यांच्या पत्राचा आधार देऊन पत्र दिले. विधान परिषदेचे तात्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सात जून 2019 रोजी फडणवीस यांना निवेदन दिले. त्यानंतर नियोजन विभाग मंत्रालय यांनी जिल्हाधिकारी यांना याप्रकरणी पत्र काढले पुढे राज्यपाल सचिवालयाने सुद्धा याबाबत प्रधान सचिव पर्यटन विभाग यांना पत्र काढले.
मागील पाच वर्षापासून हा पाठपुरावा काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शरद गुमटे हे करीत आहेत असे असताना विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडून याबाबत श्रेय घेण्यात आले असल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. पण गुमटे यांच्या प्रयत्नाने तत्कालीन पर्यटनमंत्री यांच्याकडे पाठपुरावा झाला आणि महानगरपालिकेत ठराव करुन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तिर्थक्षेत्रात समावेश झाल्याने हा निधी मंजूर झाला असल्याचा दावा गुमटे यांनी केला आहे.