काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली शिवसेनेची स्पॉन्सर शीप ; मराठा प्रीमियर लीगचा असा मजेशीर राजकीय योग
सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यातील मराठा समाजातील होतकरू खेळाडूंसाठी समाजातीलच मान्यवरांनी एकत्र येऊन मराठा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा सुरू केली आहे. त्या क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंचा लिलाव अर्थात ऑक्शन मंगळवारी पुष्पस्नेह लॉनमध्ये एका शानदार सोहळ्यात संपन्न झाले. परंतु यावेळी एक मजेशीर असा राजकीय योग पाहायला मिळाला.
तो म्हणजे ही स्पर्धा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश नेते प्रशांत बाबर यांनी आयोजित केली आहे. त्यांच्या सोबतीला संघ मालक म्हणून काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह इतर समाजातील मान्यवर आहेत. या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण तसेच खेळाडूंसाठीच्या टी-शर्टचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेला स्पॉन्सरशिप एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे. तसेच त्यांच्या वतीने इतरही काही बक्षीस असल्याचे सांगण्यात आले.
ज्यावेळी टी-शर्ट चे अनावरण होते. त्यावेळी मंचावर प्रशांत बाबर, विनोद भोसले, भाजप नेते अनंत जाधव, रणजित चवरे, राम साठे, सुनील जाधव, रवी भोपळे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मिलिंद गोरे (जे क्रिकेट स्पर्धेत स्कोरर म्हणून काम पाहतात) हे उपस्थित होते. टी-शर्ट वर एकनाथ शिंदे यांचा फोटो पाहून विनोद भोसले यांनाही काहीसे हसू आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांमधून काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली शिवसेनेची स्पॉन्सर शिप असे मजेशीर शब्द बाहेर आले. त्याचवेळी जेव्हा ट्रॉफी अनावरण होती तेव्हा ट्रॉफीवर अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो तर नाहीत ना असेही मजेदारपणे उपस्थित म्हणाले.
शहरी भागातील संघांच्या लिलाव प्रक्रिया करिता एकूण २१० मराठा खेळाडूंची नोंदणी झाली होती, या खेळाडूंना संघांचे प्रायोजक/मालक व कर्णधार यांच्या उपस्थित, वतीने १ लाख पॉइंट्स मध्ये लिलाव पद्धतीने संघात घेण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे नाव, फोटो मंचावरील स्क्रीनवर दाखवून तसेच घोषणा करून योग्य ती विभागणी करण्यात आली असून प्रत्येक संघात 15 खेळाडू असणार आहेत. शहरी भागातील आठ संघांचे प्रायोजक/मालक अमोल भोसले, सुनील चव्हाण, सचिन मगर, विक्रांत वानकर, रवी भोपळे, संभाजी केत, रणजित मुळीक, वैभव जाधव यांचे समवेत त्यांचे संघ कर्णधार सागर गव्हाणे, नितीन गायकवाड, बाळकृष्ण काशीद, चेतक गोरे, रोहित जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गोरे यांनी व लिलाव प्रक्रिये साठी अजित शापरकर यांनी काम पाहिले.