सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य हा एकच विभाग आमदारांच्या रडारवर राहिला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अनेक दवाखाने बांधून तयार आहेत. ते सुरू का होत नाहीत, अनेक दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, आरोग्य विभागाची यंत्रणा नक्की काय करते? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी सांगोल्यातील दवाखान्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्याच प्रश्नावर आमदार राम सातपुते, माजी आमदार दीपक साळुंखे, निमंत्रित सदस्य करमाळ्याचे महेश चिवटे, आमदार समाधान आवताडे, खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आपापल्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रश्न मांडले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी कर्मचारी भरती बाबत आपले स्पष्टीकरण दिले, कर्मचारी भरती हे आमच्या स्तरावर केली जात नाही शासनाच्या आदेशानुसार होते, सध्या भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हे सुरू असताना अचानक ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी हे डीएचओ काय कामाचे, उत्तर देता येत नाहीत, त्यांना बदला असे म्हणून लक्ष वेधले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेला सूचना करताना जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्राची सविस्तर माहिती रिक्त पदांची संख्या आयोजित बैठकीत सादर करण्याच्या सूचना केल्या.