सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांच्या वस्तूंसाठी कोल्ड स्टोरेज ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील डीपीसीतून एक कोटी साठ लाख देणार ; महिलांना दिला अनोखा सल्ला
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांच्या वस्तू टिकून राहण्यासाठी आणि त्या काही दिवस ठेवण्यासाठी सोलापुरात कोल्ड स्टोरेजसाठी एक कोटी साठ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून देण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यंदाचा रुक्मिणी महोत्सव वोरोनोको प्रशालेत दिनांक 21 ते 23 जानेवारी या तीन दिवसात भरवण्यात आला असून त्याचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, प्रकल्प संचालक ठोंबरे, प्रकल्प संचालक अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, उमेद अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, मीनाक्षी मडवळी, पालकमंत्र्याचे ओएसडी बाळासाहेब यादव, मोहन डांगरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री ना.पाटील म्हणाले , आजच्या महिलांमध्ये पदवीधर , पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे पण त्यांनी स्वतःची ओळख फक्त हाऊस वाईफ न ठेवता घरातील जबाबदारी पार पाडून घर व संसाराला हातभार लावण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन बाजारात कोणत्या उद्योग व सेवांची गरज आहे हे लक्षात घेऊन विविध उद्योग सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.अमरावती जिल्ह्यात बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी मेळघाट मार्केट प्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या वस्तू विकत घेऊन त्यांना पुरेसे पैसे देण्याची व्यवस्था निर्माण करा आणि त्यासाठी मी कधीही सहकार्य करणार असल्याचेही सांगितले.
यावेळी प्रास्तविकामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून कठोर परिश्रम घेऊन विविध वस्तूंची निर्मिती करत आहेत.त्यांच्या वस्तूंचे ब्रँडिंग करण्यासाठी अॕप निर्मिती , आॕनलाईन करणे यासाठी लवकरच प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी मानले. सदर मिनी सरस व रुक्मिणी महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, शितल म्हांता, अमोल गलांडे, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.
पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे केले कौतुक…!
सोलापूर जिल्ह्यात बचत गटाची चळवळ जोमाने वाढण्यासाठी पर्यायाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेला मनिषा आव्हाळे या कर्तव्यदक्ष महिला मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत असल्याबद्दल पालकमंत्री यांनी आपल्या भाषणामध्ये त्यांचे कौतुक केले.
—————
सिईओ आव्हाळे यांनी घेतला भेळ व पाणीपुरीचा आस्वाद…!
आजच्या रुक्मिणी महोत्सवामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी उदघाटन कार्यक्रमानंतर स्वतः बचत गटाच्या सर्व स्टाॕल भेट देऊन भेळ व पाणी पुरीचा मनमुरादपणे आस्वाद घेतला तसेच त्यांनी हँडबॅग, घाण्यावर तयार केलेले सूर्यफूलांचे तेल खरेदी केले.त्यामुळे बचत गटाच्या स्टाॕलधारक महिलांमध्ये उत्साह आल्याचे दिसून आले.
———