मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या सिंचन योजनेस मंत्री मंडळाची मान्यता ; आमदार प्रणिती शिंदे यांच्या दबावामुळे शासनाचा निर्णय
सोलापूर : मंगळवेढाच्या 24 गावांचा सिंचन योजनेस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूरी मिळाली. आमदार प्रणिती शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा प्रश्न लावून धरला होता व अधिवेशन संपल्यानंतर 24 गावांचा गाव भेट दौरा केला त्यामुळे शासनावर दबाव निर्माण झाल्यामुळे शासनास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तातडीने मंजूरी द्यावी लागली.
सोलापूर जिल्ह्यामधील मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी, लेंडवे चिंचळे, शिरशी गोणेवाडी, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव खडकी, जुनोनी, पाटकळ, येड्राव जित्ती, जाळीहाळ, हाजापुर सिद्धन्केरी, खवे भाळवणी, निंबोणी, रड्डे, गणेशवाडी हिवरगाव, मेटकरवाडी, शेलेवाडी, भोसे नंदेश्वर, हुन्नुर, मानेवाडी, पडोळकर, रेवेवाडी, महमदाबाद (हु) मारोळी, लवंगी, चिक्कलगी, सलगर बु,, सलगर खु,पौट, बावची, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी या दक्षिण भागातील 35 गावाच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून पूर्णपणे सुटलेला नाही. या गांवामधील बहुतांश सरपंच, उपसरपंच यांनी आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेतली होती. हा प्रश्न 2009 च्या पूर्वी पासून लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरलेला आहे. या तालुक्यातील 35 गावामधील 11 गावांना म्हैसाळ योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे व आज काही प्रमाणात या गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत आहे. उर्वरीत 24 गावासाठी उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. या योजनेस प्रशासकीय मान्यता देखिल देण्यात आली. सध्याच्या काळात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची तिव्र समस्या निर्माण झालेली होती. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी हा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लावून धरलेला होता व शासनावर दबाव बनवून ठेवलेला होता. या प्रश्नावर शासनाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी या 24 गावांचा गाव भेट दौरा केला व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू व हा प्रश्न सुटेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपण काम करत राहू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले होते. या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर शासनाने आज तात्काळ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंगळवेढ्यातील 35 गावांच्या सिंचन योजनेला मान्यता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मंगळवेढ्यातील या दुष्काळी भागातील गावामधून आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानण्यात येत आहे.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांचा शेतीचे व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गेली 40 वर्षापासून प्रलंबित होता 2009 पासून मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील या गावांच्या पाणी प्रश्नासाठी संबंधित भागातील शेतकरी अतिशय आक्रमक झालेले आहेत तेव्हापासून हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे 2014 मध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण व तत्कालीन आमदार कै भारत भालके यांनी राज्यपालाकडून विशेषबाब म्हणून मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी तत्त्वता मंजुरी घेतली त्यानंतर दुर्दैवाने सदर योजनेचा पाठपुरावा विरोधी सरकारमुळे पूर्ण होऊ शकला नाही सध्या तोच प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक 12 2 2024 रोजी मंगळवेढा काँग्रेस कार्यालय येथे दक्षिण भागातील 24 गावच्या सरपंचांबरोबर व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर पाण्याविषयी मीटिंग घेऊन पुढे होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 24 गावाच्या व म्हैसाळच्या 18 गावाच्या पाण्याविषयी आवाज उठवला व लगेच मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांमध्ये प्रत्यक्ष गाव भेटी देऊन त्या ठिकाणच्या लोकांबरोबर मी या लढ्यामध्ये तुमच्याबरोबर आहे असे आश्वासन देऊन सदरचा प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी तुमच्याबरोबर आहे आणि मी या संदर्भात पाठपुरावा करणारच असे ठणकावून सांगितल्यानंतर सदरचा मेसेज विरोधी पक्षाला पोचल्यामुळे आणि काँग्रेसच्या आक्रमकतेमुळे विरोधी पक्षाला नमते घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना सदरच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेस मंजुरी देण्यासाठी भाग पाडले. सदरच्या 24 गावाच्या उपसा सिंचन योजनेसाठी शासनाने मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिल्याबद्दल मंगळवेढा तालुक्यातील 24 गावच्या जनतेच्या वतीने मी शासनाचे आभारी आहे व भविष्यात शासनाने सदर प्रकल्प योजनेस कालावधी ठरवून देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा मी सदरच्या निधीसाठी पाठपुरावा करण्यासाठी जनतेतून उठाव करणार आहे.