ब्रेकिंग न्यूज ! उमेश पाटील राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ते पदाच्या राजीनाम्याच्या तयारीत
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याने खळबळ उडाली आहे. उमेश पाटील यांनी शुक्रवारी आपल्या मोहोळ येथील सावली या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली .
मोहोळ तालुक्यातील अनगर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय झाल्याने संपूर्ण मोहोळ तालुक्याने याला विरोध दर्शवला. सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आली. त्यानंतर हे तहसील कार्यालय कुरुल किंवा कामती या ठिकाणी करावे अशी मागणी करण्यात आली.
परंतु काही महसूल मंडळे वगळण्यात येऊन हे कार्यालय त्याच ठिकाणी करण्याचा निर्णय झाला. दरम्यान अजित पवार यांची जन सन्मान यात्रा मोहोळ मध्ये येऊन गेली. त्यावेळी अनगर अपर तहसील कार्यालयाच्या निषेधार्थ मोहोळ बंद ठेवण्यात आले होते. त्या कार्यक्रमात स्वतः अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटलांवर टीका केली होती.
दरम्यान नाराज झालेल्या उमेश पाटील यांनी आपल्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना संपूर्ण मोहोळची जनता या अपर तहसील कार्यालयामुळे राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या विरोधात असताना पक्षाने त्यांना बळ देण्याचे काम केले. त्यामुळे आपण या पदावर राहणे योग्य नाही म्हणून राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे.