सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात एका तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेत हातात टेंबा घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करतानाच पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. गावातील व्यायाम शाळा चोरीला गेली तो भ्रष्टाचार मी बाहेर काढतोय परंतु मला प्रशासनाकडून सहकार्य होत नाही असे त्या युवकाचे म्हणणे होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. ही बैठक पावणे चारच्या दरम्यान संपली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद घेऊन ते कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी निघाले असतानाच नियोजन भवना समोर एक युवक अंगावर डिझेल ओतून घेत रस्त्यावर पळत आला. त्याच्या हातात जळता टेंबा होता तो पोलिसांना ओरडत सांगत होता “गावातील व्यायाम शाळा चोरीला गेले आहे, त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे. तो भ्रष्टाचार मी बाहेर काढतोय परंतु मला प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही असे म्हणून तो पोलिसांसमोर विनवण्या करत होता. मला पत्रकारांशी बोलू द्या असेही तो म्हणत होता.
तितक्यात पोलिसांनी तातडीने त्याच्या जवळ जात त्याच्या हातातील डिझेलचा डबा आणि जळता टेंभा हिसकावून घेऊन त्याला ताब्यात घेतले या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मागील काही महिन्यांमध्ये पालकमंत्र्यांसमोर असे गोंधळ होण्याचा आता हे तिसरा प्रकार आहे. त्यामुळे पोलिसांनी आणखीच बंदोबस्त वाढवण्याचे पाहायला मिळते.