ब्रेकींग ! मोहोळच्या मालकांना दणका ; अनगरचे अपर तहसील कार्यालय रद्द ; उच्च न्यायालयाचा निकाल
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अनगर येथे झालेले अपर तहसील कार्यालय रद्द करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा आदेश कोर्टाने दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुक्याचे नेते उमेश पाटील आणि सहकाऱ्यांनी या निकालानंतर आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला आहे. अनगर येथील अपर तहसील कार्यालय रद्द झाल्याचा निकाल हा माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
मोहोळ तालुक्यात मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय हे अनगर या ठिकाणी हलवण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यातून त्याला विरोध झाला, तरीही त्या ठिकाणी तहसील कार्यालय सुरू करण्यात आले. दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा प्रकर्षाने गाजला आणि आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला. राजू खरे आमदार झाले. त्यांच्या पराभवाला अनगर अप्पर तहसील कार्यालय हे कारणीभूत ठरल्याचे मानले जाते.
आमदार राजू खरे यांनी अधिवेशनात हे तहसिल कार्यालय रद्द व्हावे यासाठी आंदोलन करित लक्ष वेधले होते. या तहसील कार्यालयाच्या विरोधात भाजप नेते संतोष पाटील यांनी उच्च न्यायालयात सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी होऊन सोमवारी उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि हे तहसील कार्यालय रद्द करण्यात आल्याचे उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगताना संपूर्ण मोहोळकरांचे आभार मानले आहेत.