शिवसेनेनं माझ्यासमोर पक्ष प्रवेशाची अट कायम ठेवली होती, पण मी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. छत्रपतीला आम्हाला बाजूला ठेवायचे नाही. बरोबर ठेवायचे आहे. त्यामुळे तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर ठेवला होता,असे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
काय म्हणाले संभाजीराजे?
“सर्वप्रथम सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी केलं हे मी कदापी विसरु शकत नाही. माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील राजकीय दिशा कशी असणार याबाबत 12 मे रोजी पुण्यात दोन निर्णय जाहीर घेतले. त्यानुसार राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार. पुण्यातील पत्रकारांनी पीसी ऐकल्यावर मला विचारलं हा भाभडेपणा नाहीये का? मी म्हटलं हो. मला सर्व गणितं माहिती आहेत. पुढील प्रवास किती खडतर आहे. मला सर्व पहायचं होतं. सर्व अनुभवायचं होतं. गेली 15 ते 20 वर्षे नवीन राजवाडा सोडून मी कम करत आहे. राज्यभर फिरतोय. प्रामाणिकपणे भूमिका मांडत होतो. सर्वपक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेवर पाठवावं असं वाटत होतं”. असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.


















