सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख एकत्रित जिल्हाधिकाऱ्यांकडे ; या विषयांचा पाठपुरावा
सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख आणि ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख या दोन्ही आमदारांनी एकत्रित येऊन मंगळवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. दोन्ही देशमुख प्रथमच जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्याने त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विजयकुमार देशमुख यांनी मोठा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात सोलापूरला आयटी पार्क करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे तसेच शहरातील उड्डाणपूल याविषयी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचा सूचना केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार विजयकुमार देशमुख हे जुळे सोलापूर परिसरात गेले होते. तेव्हा परत येताना त्यांनी विकास नगर येथील आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत बराच वेळ चर्चा केली. या भेटीनंतर हे दोन्ही नेते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. या ठिकाणी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची भेट घेऊन बराच वेळ त्यांच्याशी शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत चर्चा केली.
यावेळी दोन्ही देशमुखांनी प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे आयटी पार्क आणि शहरातील जाणाऱ्या दोन उड्डाणपूल आणि विविध विषयावर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत आयटी पार्क व्हावे अशा सूचना केल्या होत्या तर या आयटी पार्कला आमदार सुभाष देशमुख यांनी चिंचोली एमआयडीसीतील काही जागांचा पर्याय माध्यमांसमोर बोलून दाखवला होता. मुख्यमंत्र्यांच्या आयटी पार्क घोषणेनंतर शहराचे शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत आपण पाठपुरावा केल्याचे पत्र वायरल झाले होते. त्यामुळे आयटी पार्क वरून भाजपच्याच आमदारांमध्ये श्रेयवाद रंगलाचे दिसून आले.
एकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे आता दोन आमदार देशमुख हे आता एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शहरात आता थेट दोन देशमुखांचा गट आणि कोठे, कल्याणशेट्टी आणि पालकमंत्री यांचा गट असा उघड उघड पाहायला मिळत आहे.