राम सातपुते यांच्याच नावांची अपेक्षा होती ; पण भाजपकडून विधान परिषदेसाठी आली ही तीन नावे
सोलापूर : विधान परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातील तीन जागांसाठी पक्षाने नावाची यादी जाहीर केली आहे. सोलापुरातून माजी आमदार राम सातपुते किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची अनेकांना अपेक्षा होती. त्यातल्या त्यात राम सातपुते यांचे नाव तर सर्वाधिक आघाडीवर होते पण पक्षाने दुसरीच तीन नावे जाहीर केल्याने सोलापुरातून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राम सातपुते यांच्याच नावाची सर्वाधिक चर्चा होती त्याला कारण ही तसेच आहे. माळशिरसचे विद्यमान आमदार असतानाही त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी तयार झालेले सामाजिक वातावरण यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
अशातच माळशिरस मधील ही राजकीय समीकरणे बिघडली. त्यामुळे सातपुते यांना सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी ही चर्चा होती पण सातपुते यांनी माळशिरस मधूनच लढण्याचा निर्धार केला आणि तेथे निवडणूक लढवली. पण काही थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्ष निश्चितच त्यांना विधान परिषदेवर घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु भाजपने इतर तीन नावे जाहीर केल्याने त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह पाहायला मिळत आहे.