भाजप नेते दिलीप कांबळे यांचे सोलापुरात जनतेला हे आवाहन ; येत्या पाच दिवसात….
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी ही आपला जाहीरनामा तयार करीत आहे. अंमलबजावणी आराखडा तयार करताना राज्याच्या विकासासाठी भाजपने जनतेतून सूचना स्वरूपात मागविल्या असून त्या पाठवाव्यात असे आवाहन भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी सोलापुरात केले आहे. येत्या पाच दिवसात नागरिकांनी आपल्या सूचना शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या मार्फत पाठवाव्यात असेही ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारांनी केंद्रात आणि राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर उल्लेखनीय यश मिळविले आहे. परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने असतात. संकल्प पत्र ही पुढची पायरी होती. आता सत्तेवर पुन्हा येण्याच्या आत्मविश्वासातून आम्ही आमच्या संकल्पांतून कश्या प्रकारे अमलात आणायचा आराखडा तयार करीत आहोत’, असे ही कांबळे यांनी सांगितले.
भाजपने 2024 च्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 30 सदस्यांची एक जाहीरनामा समिती नियुक्त केली असून सुधीर मुनगंटीवार यांच्या व्यतिरिक्त या समितीत डॉ. विनय सहस्रबुद्धे, माधव भांडारी, उज्ज्वल निकम, डॉ. भारती पवार, सुभाष देशमुख, श्रीमती माधवी नाईक, दिलीप कांबळे, खा. धनंजय महाडिक, संभाजी निलंगेकर, धनंजय मंगरूळे, केशव उपाध्ये, अनिल सोले, नरेंद्र पवार इत्यादींचा समावेश आहे. सूचना पाठविण्यासाठी पक्षाने आपल्या वेबसाइटवर एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. मतदारांनी इ-मेल अथवा पत्र पाठवून आपल्या ठोस सूचना पाठवाव्यात असे आवाहन पक्षाने केले आहे.