दिलीप स्वामी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार ; विधानसभा निवडणुकीत या कामाबद्दल होतोय गौरव
सोलापूर : छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना निवडणूक आयोगाकडून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासह छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याही गौरव केला जाणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत टपाली मतपत्रिका देवाण-घेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल औरंगाबादचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याचे पाहायला मिळाले आहे.
यासंदर्भात आज मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा, उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा, टपाली मतपत्रिका देवाण घेवाणचे उत्कृष्ट नियोजन, मतदान साहित्य प्राप्त करण्याचे नियोजन, उत्कृष्ट मतदार सुविधा , उत्कृष्ट वार्तांकन आणि उत्कृष्ट शासकीय भागीदारी अशा गटात पुरस्कार जाहीर झाले. टपाली मतपत्रिकांची देवाण घेवाण करण्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पुरस्कार जाहिर झाला आहे.
दि. २५ जानेवारी, २०२५ हा दिवस देशभरात १५ वा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरावरील कार्यक्रम एम.आय.टी. विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमामध्ये राज्यातील लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.