बंजारा समाज बांधवांचे स्वामी समर्थांच्या चरणी साकडे ; आमचे भाऊ मंत्री व्हावेत
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांची मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घालण्यात आले.
शिवसेना तथा माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार तथा बंजारा समाजाचे सुपुत्र संजय राठोड यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी यासाठी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी टायगर ग्रुपच्या अध्यक्ष कविता चव्हाण, श्रीमंत चव्हाण, राष्ट्रीय बंजारा परिषद युवा प्रदेश अध्यक्ष युवराज चव्हाण, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाबू जाधव, विनोद राठोड, प्रमोद खटके आदींनी श्री स्वामी समर्थ मंदिरात महाआरती करून श्री स्वामी समर्थ महाराज यांना साकडे घातले.
बंजारा समाजाच्या प्रश्नासाठी नेहमी पुढाकार घेऊन समाजाच्या प्रश्न सोडवण्यासाठी आणि गोरगरिबांना मदतीचा हात देऊन समाजाला उन्नतीचा वाटचालीकडे नेणारे नेतृत्व म्हणून संजय राठोड यांची ख्याती आहे. यामुळे येत्या 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना संधी मिळावी असं साकडं श्री स्वामी समर्थ चरणी घालण्यात आले.