सोलापूर : सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा खासदार सलग दोन वेळा सुमारे दीड लाखाच्या फरकाने निवडून आला परंतु या दहा वर्षात सोलापूरच्या विकासापेक्षा भाजपची बदनामीच या दोन खासदारामुळे सर्वाधिक झाल्याचे पाहायला मिळाले.
2014 च्या नरेंद्र मोदी यांच्या लाटेत शरद बनसोडे हे अनपेक्षित पणे विजय झाले परंतु त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या वादग्रस्त कारकीर्द देणे ते लक्षात राहिले. दारुडा खासदार म्हणूनही त्यांची काँग्रेसने थट्टा उडवली.
त्यानंतर 2019 साली भारतीय जनता पार्टीने डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी दिली. महाराज सुमारे एक लाख 58 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. पण या पाच वर्षात विकासापेक्षा महाराजांच्या बोगस जात प्रमाणपत्राची चर्चा झाली. त्यावर अजूनही जात पडताळणी समिती आणि न्यायालयात प्रकरण सुरू आहे. सर्वाधिक काळ मठात घालवलेल्या महाराजांना सोलापुरी जनतेत रमता आले नाही. त्यातच त्यांच्या मौन व्रताने तर विकासाचे बारा वाजवले.
आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. काँग्रेस पक्षाने आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवतील अशी घोषणा यापूर्वीच केल्याने भाजप समोर आता उमेदवार द्यायचा कोणी? असा प्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सोलापुरात भाजपचा नवा उमेदवार देण्याचे संकेत दिले असून तो उमेदवार सोलापूरच्या दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढेल असेही ते म्हणाले होते.
राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची संघटनात्मक बांधण्याची जबाबदारी आहे. त्यांचा मागील अनेक वर्षापासून सोलापूरशी चांगला संबंध असून ते कायम सोलापूरकरांच्या टच मध्ये राहिले आहेत. मूळ बारामतीचे असणारे अमर साबळे हे शरद पवार यांचे राजकीय विरोधक आहेत.
राज्यसभेच्या खासदारकीसाठी अनेकजण इच्छुक असतात परंतु न मागता अमर साबळे यांना खासदारकी मिळाली. त्यांचे राज्यसभेतील काम पाहून तीन महिन्यातच त्यांना व्हीप बनवण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत त्यांच्या नावाची शिफारस पार्लमेंटरी बोर्डाने उपराष्ट्रपती पदासाठी केली होती. त्यास प्रधानमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली होती.
केवळ सहा महिन्याचे कामकाज पाहून त्यांचा उपराष्ट्रपती पदासाठी विचार होऊ शकतो तर याचा अर्थ राज्यसभेतील त्यांचे कामकाज निश्चितच कौतुकास्पद होते.
सोलापूर लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षात जनतेने भाजपवर विश्वास टाकला परंतु निवडून आलेले खासदार जनतेच्या विश्वासात उतरू शकले नाहीत. जर सोलापूर लोकसभेसाठी अमर साबळे यांना संधी मिळाली आणि ते निवडून आले तर पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यासोबत असलेल्या त्यांचा चांगला संपर्क, त्यांची विकासाची दृष्टी आणि डायनॅमिक व्यक्तिमत्व हे सोलापूरच्या विकासाचे बॅकलॉग भरून काढेल अशी चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमधून ऐकण्यास मिळते.
एकूणच देशातील राजकीय परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल असे चिन्ह आहेत. सोलापूर वर पंतप्रधान मोदी यांचे विशेष लक्ष असते, त्या सोलापूरकरांनी साबळे यांना लोकसभेत पाठवले तर निश्चितच सोलापूर लोकसभेचा अपेक्षितपणे विकास होऊ शकेल.
बारामती सारख्या पवारांच्या बालेकिल्ल्यात राहून संघ स्वयंसेवक, निर्भीड पत्रकारिता आणि भाजपचे संघटनात्मक काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना जिद्दीने काम करून स्वतःची ओळख तयार केली. बारामती मध्ये राहून पवारांना राजकीय विरोधक करून भाजपच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अविरतपणे अमर साबळे यांनी आपली राजकीय कारकीर्द उज्वल केली आहे. त्यामुळेच या सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांच्या नावाची चर्चा असून सोलापूरचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या नावाबद्दल मतदारांमधूनही विशेष अपेक्षा व्यक्त होत आहेत.