सोलापूरचा ‘आम आदमी ‘ काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंच्या सोबत
सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. ही निवडणूक देशाचे संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी महत्वाची निवडणूक आहे. त्यामुळे केंद्रातील हुकूमशाहीच्या विरोधातील हा लढा लढण्यासाठीच सोलापुरात आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीला पाठिंबा दिला असल्याचे मत आपचे जिल्हाध्यक्ष महादेव मोरे पाटील यांनी व्यक्त केले.
इंडिया आघाडीकडून सोलापुरात प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीनेही आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले की, संविधानाच्या संवर्धनासाठी आपचे सर्व कार्यकर्ते आपल्या जिवाचे रान करून काँग्रेस आणि INDI आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचारात उतरणार आहेत.
देशात जाती धर्मामध्ये विष पेरण्याचे काम सुरू आहे. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केली जात आहे. तसेच देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे या हुकूमशाहीला सत्तेततून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीचे हात बळकट करायचे आहेत. म्हणूनच आपने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
या पाठिंब्याच्या कार्यक्रमावेळी जिल्हा उपाध्यक्ष ऍड. खतीब वकील, शहराध्यक्ष निहाल किरनळ्ळी, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, महा सचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, जिल्हा महासचिव सतीश लोंढे-पाटील, शहर खजिनदार सुचित्रा वाघमारे, जिल्हा प्रवक्ते बंडू मोरे, उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, अनिल वाले, प्रमोद अवताडे, बसवराज सारंगमठ, रविकांत शिरगिरे, आंनद जाधव,अजय दारलू, अल्ताब तांबोळी, आकाश गायकवाड, प्रसाद बाबानगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.