राम सातपुते यांच्या स्वागताला मालकांच्या कार्यकर्त्यांची वाणवा ; किरण देशमुखांची ही दांडी ; आमदार, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी तासभर थांबून
सोलापूर : भारतीय जनता पार्टीने सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी यंदा माळशिरस आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सातपुते यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी उमेदवार राम सातपुते यांचे सोलापुरात स्वागत करण्याच्या दृष्टीने जंगी नियोजन केले होते. या स्वागताला भले माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख, माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख हे जरी उपस्थित नसले तरी त्यांचे कार्यकर्ते उपस्थित राहणे महत्त्वाचे होते. त्यामध्ये सर्वाधिक कार्यकर्ते हे सुभाष देशमुख गटाचे दिसून आले.
विजय देशमुख गटाचे काही बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते पाहायला मिळाले. खरे तर देशमुख यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख हे भारतीय जनता युवा मोर्चाचे सोलापूरचे शहराध्यक्ष आहेत पण त्यांनीच या स्वागत समारंभाला दांडी मारण्याचे पाहायला मिळाले. माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, किरण पवार असे काही ठराविकच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित दिसून आले. इतर कोणीही माजी नगरसेवक दिसले नाहीत. तसे पाहायला गेले तर आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी हे तब्बल पाऊण तास भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या स्वागतासाठी थांबून होते हे विशेष. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे सुद्धा या स्वागताला उपस्थित दिसून आले.
सातपुते यांनी सोलापुरातील महापुरुषांना अभिवादन करून रात्री उशिरा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती मंदिराच्या बाजूला असलेल्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मालकांनी उमेदवार सातपुते यांचे स्वागत केले आणि आपली सर्व यंत्रणा आणि कार्यकर्ते आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.
एकूणच सोलापुरातील दोन आमदार देशमुखांमधील गटबाजी यावेळी पाहायला मिळाली. सुभाष देशमुख यांचे कार्यकर्ते मनापासून स्वागताला उपस्थित असल्याचे दिसून आले, त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख हे सुद्धा उपस्थित होते परंतु विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते काही बोटावर मोजण्याइतके आणि दिखाऊपणा करण्यासाठीच उपस्थित होते का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.