राष्ट्रवादीच्या किसन जाधव यांच्याकडून अजित पवारांचे तोंडभरून कौतुक ; शहराच्या विकासासाठी 7 कोटींचा निधी दिल्याची माहिती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या विकासकामांकरिता राज्य शासनाकडून सात कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापूरवर विशेष प्रेम असल्याने सोलापूर शहरातील विकासकामांकरिता त्यांनी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील प्रभाग २२ मधील लिमयेवाडी येथे अंतर्गत ड्रेनेजलाईन व याच ठिकाणावरील बुवा गल्ली येथे पिण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणे, विजापूर नाका येथील रेवणसिद्धेश्वर मंदिराची रंगरंगोटी व विकास कामे करणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे, क्षत्रिय समाज मंदिर बांधणे, राजमाता अहिल्यादेवी होळकर समाजमंदिर बांधणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे, गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे, आदि जांबमुनी महाराज मोची समाज समाजमंदिर बांधणे, बसवेश्वर महाराज सांस्कृतिक सभागृह बांधणे, पद्मशाली समाजाकरिता सांस्कृतिक सभागृह बांधणे, मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह बांधणे, ख्रिश्चन समाजाकरिता सांस्कृतिक भवन बांधणे व प्रभाग २२ येथील दोन नंबर झोपडपट्टीत रस्ता कॉक्रिटीकरण करण्याच्या कामासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे.
दरम्यान सोलापूरच्या माजी महापौरांनी सोलापूर शहराच्या विकास कामांसाठी पाच कोटी रुपये निधी आणला होता. परंतु सोलापूरवर अजितदादांचे विशेष लक्ष आणि प्रेम असल्याने सात कोटी रुपये इतका निधी आम्हाला मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोलापूर शहराच्या विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी करताच एका दिवसाच्या आत सात कोटी रुपये इतका निधी त्यांनी उपलब्ध करून दिला. सोलापूरचा चेहरा मोहरा येणाऱ्या काळात विकासाच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने बदलेल. त्यासाठी आणखीन निधी आपण मिळवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देखील यावेळी किसन जाधव यांनी दिली. या पत्रकार परिषदेस अजित पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांची उपस्थिती होती.