सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हील हॉस्पिटलमध्ये बुधवारी ओपीडी मध्ये मोठी गर्दी उसळली, नागरिकांच्या रांगाच रांगा दिसून आल्या. सिव्हील मधील ओपीडीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या औषध भांडार येथे औषध वाटपाच्या खिडक्या कमी उघडण्यात आल्याने गर्दी वाढली आणि रांगा लावून नागरिक औषध घेत आहेत. वृद्ध आणि महिलांची तारांबळ होतानाचे चित्र पाहायला मिळाले.
याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले की, गेले अनेक दिवसापासून सेवानिवृत्त झालेल्या फार्मासिस्ट कर्मचाऱ्यांची त्याठिकाणी पदे न भरून घेतल्यामुळे केवळ 4 खिडक्यातून औषधे दिली जात आहेत. आज बुधवारी सुट्टी असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटला येतो, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. यावरून सिव्हील हॉस्पिटलमध्ये नियोजनाचा किती अभाव असल्याचे समोर येते.
आपल्या कामकाजात वक्तशीरपणा आणि शिस्तीचा संदेश देणारे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांचे याकडे लक्ष नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून सिटी स्कॅन मशीन बंद अवस्थेमध्ये आहे. नागरिकांची गैरसोय होत असून एक्स-रे सोनोग्राफी काढण्यास प्रचंड गर्दी पडत आहे. अपंग असलेल्या रुग्णांना सिटीस्कॅन काढण्याची सूचना केल्यास त्यांना बाहेरून करून आणा असे सांगितले जात आहे. त्यामुळे गोरगरीबांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. अंध व अपंग दाखले काढण्यासाठी परगावीहून आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे