आता थेट शाळेवरच फौजदारी गुन्हे दाखल करणार ; दहावी- बारावी परीक्षेसाठी यंदा जिल्हा प्रशासन झाले अती स्ट्रिक्ट
सोलापूर : यंदाची दहावी आणि बारावीची परिक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन अती कडक पावले उचलणार असून परीक्षे दरम्यान केंद्रावर कॉपी प्रकार आढळून आल्यास त्या शाळेवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषद प्रशासकीय कारवाई करेल आणि पोलीस प्रशासन फौजदारी कारवाई करेल असेही आशीर्वाद यांनी सांगितले.
इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्यानंतर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आहे दहावीसाठी एकूण 182 केंद्रामधून 65 हजार 749 विद्यार्थी आणि इयत्ता बारावी साठी एकूण 118 केंद्र मधून 55 हजार 541 विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत.
जिल्ह्यास्तरावर एकूण 18 भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत. तालुका स्तरावर तहसिलदार, गट विकास अधिकारी यांचे अधिनस्त स्वतंत्र भरारी पथकांची नियोजन करणेत आलेले आहे. तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक (2) प्राचार्य डायट, प्रशासन अधिकारी म.न.पा सोलापूर यांचे अधिनस्त स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करणेत आलेली आहेत.