सोलापूर जिल्हा परिषदेत हा झाला चेष्टेचा विषय ; किती वेळा जातो अन् किती वेळा येतो बाबा..!
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या एक विषय अतिशय चेष्टेचा झाल्याचे ऐकण्यास मिळत आहे. त्या विषयाला कारण ही तसेच आहे. आता जिल्हा परिषदेत किती वेळा जाणार आणि किती वेळा येणार बाबा..! असे शिक्षक संघटनांचे लोक मजेशीरपणे म्हणू लागले आहेत.
जिल्हा परिषदेमधील माध्यमिक शिक्षण अधिकारी मारुती फडके हे मागील काही सात महिन्यात चार ते पाच वेळा रजेवर गेले आहेत. रजेवर जातात काही दिवसांनी परत येतात, रजेवर जाताना त्यांची वेगवेगळी कारणे असतात. ते आपल्या तब्येतीचे कारण सांगून रजा घेतात.
आता जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला असा प्रश्न पडला आहे की त्यांचा अतिरिक्त पदभार द्यायचा कुणाकडे? कारण यापूर्वी ज्या अधिकाऱ्यांकडे हा पदभार गेला होता. त्या अधिकाऱ्यांनाही त्या पदावर व्यवस्थित काम करता आले नाही. कामांमध्ये सुसूत्रता आली की लगेच फडके जॉईन व्हायला बघतात त्यामुळे त्यांचा पदभार घेण्यास आता तृप्ती अंधारे या सुद्धा तयार नसल्याचे ऐकण्यास मिळत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या सुद्धा फडके यांच्या वेगवेगळ्या कारणामुळे संतापल्या आहेत. आता तर आपल्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी चार दिवसाची रजा घेतली आहे. मागील 15 दिवसापूर्वीच त्यांनी पदभार घेतला होता. परत ते चार दिवसाच्या रजेवर गेले आहेत. यावर सीईओ आव्हाळे यांनीही नाराजी व्यक्त करताना आपल्या रजेच्या दरम्यानच त्यांनी ही सर्व घरगुती कामे करून घ्यायला हवी, वारंवार रजेवर जाणे योग्य नाही असे त्यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये फडके यांचा विषय आला की त्यांची चेष्टा होऊ लागली आहे. फडके यांच्या जागेवर पूर्ण वेळ अधिकारी द्यावा अशी ही मागणी या विभागातील कर्मचारी करत आहेत.