भाजपच्या राजेश काळे यांनी घेतला राष्ट्रवादीच्या काका साठे यांचा आशीर्वाद ; राजेश काळे यांचे झेडपीत काय काम?
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे भाजपचे माजी उपमहापौर राजेश काळे हे सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये आले होते. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे थांबले होते. राजेश काळे यांना काका आणि काही पत्रकारांनी पाहताच काळे यांचे झेडपीत काय काम? असाच प्रश्न सगळ्यांच्या तोंडून आला.
तेव्हा काळे हे काकांना पाहताच ते थांबले. काका नमस्कार करतो आशीर्वाद राहू द्या असे ते म्हणाले. तेव्हा पत्रकारांनी तो फोटो टिपला आणि “काका तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तुम्ही भाजपचे यांचा आशीर्वाद कसा काय?” असा प्रश्न पत्रकारांनी केला.
तेव्हा काळे यांनी काका हे ज्येष्ठ आहेत भीष्म पितामह आहेत. महाभारतामध्ये अर्जुन आणि पितामह एकमेकांच्या विरोधात होते परंतु अर्जुनाला भीष्म पितामहाचा आशीर्वाद कायम होता. त्यामुळे काका हे सुद्धा राजकारणातील पितामह आहेत त्यांचा आशीर्वाद पाठीशी राहणे फार गरजेचे आहे असे म्हणून पत्रकारांशी गप्पा मारल्या.
दरम्यान काळे यांना तुमचे जिल्हा परिषदेमध्ये काय काम असे विचारले असता मी जलजीवन मिशनच्या कार्यालयात आलो आहे. जल जीवन मिशन मधून शाळांना RO मशीन पुरवण्यात येणार आहेत परंतु जलजीवन मधून RO मशीन ही देता येत नाही सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे असे त्यांचे म्हणणे आले. याबाबत कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांना भेटण्यासाठी मी जिल्हा परिषदेमध्ये आलो असल्याचे सांगून ते त्या कार्यालयाकडे रवाना झाले.