अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची किसन जाधव यांच्या निवासस्थानी भेट ; स्नेहभोजनावर मनसोक्त ताव
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी सोलापूर दौरा झाला. या भरगच्च दौऱ्यात अनेक कार्यक्रम झाले. प्रसिध्दीच्या बाबतीत माजी गटनेते तथा नूतन जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मार्केट मारले. सर्वत्र जाधव यांच्या पोस्टर मुळे राष्ट्रवादीमय वातावरण पाहायला मिळाले.
महिलांच्या आरोग्यावर सर्व रोग निदान शिबिर आयोजित करून लक्ष वेधले. या कार्यक्रमाला अजित पवारांनी उपस्थित राहत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमानंतर दादांचा ताफा वळाला तो किसन जाधव यांच्या निवासस्थानाकडे. सोबत आलेल्या सर्वच नेत्यांची वाहने सोबत होती. जाधव परिवाराने पवारांचे जोरदार स्वागत केले, निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले होते.
दादांसाठी जाधव यांनी स्पेशल मेनू ठेवला होता, दोन प्रकारचे मासे, सोलापुरी शिक कबाब, कडक नरम भाकरी, बिर्याणी असा बेत होता. अजित पवारांसह सर्वच नेत्यांनी यावेळी मनसोक्त ताव मारला.