‘द ग्रेट राजा माने’ त्यांनी करून दाखवलेच ; ‘दिलदार मनाचा, दमदार राजा’
सोलापूर : महाराष्ट्रातील डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या असंघटित पत्रकारांना एकत्र करून त्यांची मोट बांधून त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या राज्य सरकार पुढे मांडून आणि त्या प्रश्नाला वाचा फोडून त्यावर ठोस निर्णय घेण्याचा राज्यकर्त्यांकडून शब्द घेणारे डिजिटल पत्रकारांचे खमके नेते राजा माने यांनी अखेर करून दाखवले.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापूर येथील सिद्धगिरी कनेरी मठ या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि कॉर्पोरेट पद्धतीने संपन्न झाले. याचे संपूर्ण श्रेय या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि त्यांच्या राज्याच्या टीमला जाते.
महाराष्ट्रातील लाखो डिजिटल क्षेत्रात काम करणारे पत्रकार यांच्यापुढे आर्थिक उत्पन्नाचा मोठा प्रश्न परंतु त्यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या छत्राखाली एकत्रित आणले.
कोल्हापूर येथे झालेल्या संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, राज्याच्या आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न राज्यकर्त्यांसमोर तितक्याच ताकतीने राजा माने यांनी मांडले.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संघटनेच्या राज्यातील पाच हजार सभासदांसाठी मोफत आरोग्य सुविधा देण्यासह त्यांच्या मुलींचे शिक्षण आणि मुलीच्या खेळावर येणारा खर्च याची तरतूद करण्याची घोषणा केली.
समारोप प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक आणि दमदार अशी प्रकट मुलाखत झाली. मराठी चित्रपट सृष्टीतील कसलेले अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या बाउन्सर व गुगली प्रश्नावर दादांनीही जोरदार बॅटिंग केली. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या प्रश्नावर राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री या नात्याने फोर्स असा शब्द दिला.
खासदार धनंजय महाडिक यांनी संस्थापक राजा माने यांच्या कामाचे कौतुक करताना ही संघटना आता महाराष्ट्र पातळीवर काम करते, याची व्याप्ती वाढवून देशपातळीवर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी राजा माने यांच्या वाटचालीवर प्रकाश टाकताना त्यांच्यातील माणुसकीचा गौरव केला.
“मी मागील पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. अनेक ज्येष्ठ पत्रकार पाहिले, संपादक भेटले परंतु माननीय राजा माने यांच्यासारखा माणूस भेटायला मला उशीर झाला. पत्रकारिता क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. सोलापूरच्या लोकमतचे अनेक वर्ष त्यांनी संपादक म्हणून सोलापूरवर राज्य केले. आम्ही त्यांची पत्रकारिता पाहिली आहे. इतक्या मोठ्या वृत्तपत्र समूहाचे संपादक असतानाही छोट्या छोट्या पत्रकारांशी बोलताना त्यांना प्रेमाची वागणूक देताना आम्ही तो राजा पाहिला आहे. सोलापूरसह राज्यातील अनेक पत्रकारांना त्यांनी घडवले, मोठ्या पदावर बसवले, तेच मोठमोठ्या वृत्तपत्रसमूहाचे संपादक म्हणून वावरतात. त्या गोष्टीचा कुठलाही आविर्भाव माने सरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत नाही. अशा प्रेमळ राजासारख्या मनाच्या व्यक्तीशी माझा मागील दीड वर्षांपासून सहवास लाभला. त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली हे खरे तर भाग्य म्हणावे लागेल. डिजिटल पत्रकारांसाठी त्यांनी सुरू केलेली संघटना. ती आज राज्य पातळीवर विस्तारली गेली आहे, डिजिटल पत्रकारांचे प्रश्न, त्यांच्या समस्या शासन दरबारी गेल्या आहेत, त्यावर लवकरच कायदा होईल आणि लाखो पत्रकारांचे प्रश्न सुटतील याचे सगळे श्रेय हे फक्त राजा माने सरांना जाते हे मी अभिमानाने सांगतो.”
प्रशांत कटारे
अध्यक्ष,
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना
सोलापूर शहर.