सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट दिली. यावेळी प्रकाश यलगुलवार, विजय साळुंखे, प्रशांत बडवे, मोहन डांगरे, अविनाश महागावकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ग्रामीणचे सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चेतन नरोटे ही नेतेमंडळी आत उपस्थित होती. तब्बल अर्धा तास आत मध्ये त्यांनी चर्चा करत चहा घेतला. त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा माध्यमांनी त्यांना घेरले भेटण्याची प्रतिक्रिया विचारली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, 88 व्या नाट्य संमेलनावेळी सुशीलकुमार शिंदे हे स्वागत अध्यक्ष होते त्या संमेलनाला मी आलो होतो. आता शंभराव्या विभागीय नाट्य संमेलनाचा मी स्वागताध्यक्ष आहे. सुशीलकुमार शिंदे हे चांगले कलाकार आहेत अशा मोठ्या व्यक्तीला निमंत्रण देणे हे गरजेचे असून त्यासाठी मी आलो आहे असे सांगत भारतीय जनता पार्टी कडून कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही किंवा दिल्याचे ऐकलेही नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे हे अतिशय सुसंस्कृत असे कुटुंब आहे. आमदार प्रणिती शिंदे या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत, त्या जनतेसाठी कायम काम करतात, भांडत असतात जर त्या भाजपमध्ये आल्या तर स्वागतच पण, आम्ही आज भेटीदरम्यान कोणतीही भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांना दिली नाही असे स्पष्ट पालकमंत्र्यांनी सांगितले.