सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापुरात नुकताच महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला या मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचे प्रवेश घडवून आणा असे आवाहन केले होते.
सध्या कोणत्याही पक्षात नसलेले माजी गटनेते आनंद चंदनशिवे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले तौफिक शेख या दोन प्रमुख नेत्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ही भेट प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान या तिन्ही नेत्यांनी घडवून आणली.
यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, इरफान शेख, तौफिक शेख यांचे चिरंजीव आदनान शेख, प्रमोद भोसले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील वर्षीच तौफिक शेख यांनी एम आय एम पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता. नंतर अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले त्यामुळे पुन्हा सोलापूर शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
एकूणच देशातील वातावरण पाहता आता तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे यांनीही पुढच्या महानगरपालिकेच्या विचार करता अजित पवार गटाच्या संपर्कात गेले आहेत. वारंवार चंदनशिवे हे तर उमेश पाटील यांच्यासोबत दिसून आले. मंगळवारी झालेल्या अजित पवार यांच्या भेटीवरून आता या दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे.