सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना भीमा पट्ट्यातील 42 गावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात काँग्रेस नेते सुरेश हसापूरे यशस्वी ठरले.
ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मंद्रूप येथे अनंत म्हेत्रे यांच्या निवासस्थानी हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रणिती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, तालुकाध्यक्ष हरीश पाटील, तालुका महिला अध्यक्ष बेंजरपे, सिकंदरताज पाटील, माजी सभापती अशोक देवकते या प्रमुख नेत्यांसह सीना भीमा पट्ट्यातील भंडारकवठे हातुर मंद्रूप या जिल्हा परिषद गटातील गावच्या सरपंच, सोसायटी चेअरमन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश हसापुरे यांच्या नियोजनानुसार अनंत म्हेत्रे यांनी अतिशय नेटके असे नियोजन या हुरडा पार्टीचे केले होते. संपूर्ण म्हेत्रे कुटुंबीय यावेळी पाहुणचार करण्यामध्ये गुंतल्याचे पाहायला मिळाले. सुशीलकुमार शिंदे यांनी तर तब्बल साडेतीन तास या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांना वेळ दिल्याचे पाहायला मिळाले. आमदार प्रणिती शिंदे यांनीही उपस्थिती लावली. आमदार प्रणिती ताई यांनी सर्व कार्यकर्त्यांशी गप्पा मारत भोजनाचा आनंद घेतला.
या हुरडा पार्टी नंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षाने देशासाठी केलेल्या त्यागाची माहिती दिली. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केले. सुरेश हसापुरे यांच्या कार्याचे कौतुक करताना या माणसाला ओळखायला मला उशीर झाला परंतु हा माणूस स्टेट फॉरवर्ड आहे त्यामुळेच तो माझ्या अतिशय जवळचा झाला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने आपल्या घरातील कुटुंबाचे मतदान काँग्रेसला कसे पडेल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. दक्षिण सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तो पुन्हा राहिला पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भारतीय जनता पार्टीच्या धोरणांवर तोफ डागली. सोलापूर लोकसभेच्या इतिहासात आजपर्यंत पाच वेळा भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला आहे. भाजपनेही 25 वर्ष प्रतिनिधित्व केले परंतु सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर साठी काय केले? असा प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित करून मतदारांना विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय असे सांगून आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले.
सुरेश हसापुरे यांनी तर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवले. दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला आहे परंतु आपापल्या मतभेदांमुळे तो इतरांच्या हाती गेला. या दहा वर्षात या नेतृत्वाने शेतकऱ्यांना काय दिले, उलट त्यांच्या सातबारावर बोजे चढवले. सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेमध्ये नेतेपद भूषवले. सोलापूरच्या विकासात अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. अजून या माणसाने सोलापूरसाठी काय करावे, विचार करा, आपसातील मतभेद बाजूला ठेवा, आमच्याकडून काय चुकत असेल तर आमचे कान धरा पण दक्षिण तालुका भाजपकडे जाण्यापासून रोखा असे कळकळीचे आवाहन केले.
संयोजक अनंत म्हेत्रे यांनी जोरदार भाषण करताना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये युवक आघाडीच्या वतीने मजबूत अशी बूथबांधणी केल्याचे सांगितले.