सोलापूर : जिल्हा परिषदेचे सर्व ग्रामसेवक, आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी यांचे कामकाज ऑनलाइन दिसेल असा अॅप आम्ही तयार करत आहोत. त्या त्याबाबत ग्रामसेवक तसेच आरोग्य कर्मचारी संघटनेची चर्चा करून हा ॲप विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.
ग्रामसेवक गावामध्ये किती वेळ राहतो? आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात किती वेळा असतात? असे प्रश्न वारंवार उपस्थित होतात त्यासाठी आता जिल्हा परिषद ॲप विकसित करत असून ठराविक रेंजमध्ये जेव्हा ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी आल्यास त्या ॲपमध्ये त्यांच्या कामकाजाची माहिती कळेल. ते आपल्या कामकाजाची माहिती त्या ॲपमध्ये नोंद करू शकतील असे आव्हाळे म्हणाल्या.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सोडून इतर कोणत्याही विभागावर प्रश्न उपस्थित झाले नाहीत. हेच आमच्या मागील सहा महिन्याच्या कामकाजाचे यश आहे. जलजीवन मिशनचे कामकाज सुरळीत चालू आहे. महामार्गात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा त्याचाही प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे, हद्दवाढ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे असे सांगून येणाऱ्या नवीन वर्षामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य आणि शिक्षण या तीन विभागावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या वर्षात उमेद अभियान अंतर्गत असलेल्या बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सोलापुरातील डॉक्टर आंबेडकर चौकात असलेल्या नेहरू वसतिगृहाचे दोन गाळे बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात येणार आहेत. त्याची ऑनलाईन विक्री होण्यासाठी ॲमेझॉन, फ्लिपकार्ड अशा ऑनलाइन शॉपिंग ॲप्सशी कनेक्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी ही माहिती आव्हाळे यांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.