सोलापूर : रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. आज शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोर हा भीषण अपघात घडला.
यात अकरावीत शिकणारी १७ वर्षीय भाग्यश्री निवृत्ती कांबळे राहणार कोंडी हिचा मृत्यू झाला आहे.
कोंडी येथून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षा क्रमांक एमएच १३, सीटी ९४७९ आहे यास सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने मागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून बाहेर फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून बाहेर पडल्याने भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी वय वर्षे १९ ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.
भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्सची विद्यार्थिनी आहे. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार वडील हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून त्यांना फक्त दोन मुलीच आहेत त्यापैकी भाग्यश्री चा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे…सिव्हिलमध्ये सकाळपासूनच नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.