सोलापूर : जलजीवन मिशनमधून पठाणवस्ती, भांब, येळीव व पुरंदावडे (ता. माळशिरस) गावांसाठी योजना मंजूर होती परंतु काम सुरू होत नव्हते. फडतरी, सदाशिवनगर, मारकडवाडी (ता. माळशिरस) या गावात काम सुरू होते परंतु कामाला गती नव्हती. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या सात गावातील सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांची माळशिरस पंचायत समितीत सुनावणी घेऊन अवघ्या काही मिनिटात सात गावांच्या योजनेचा प्रश्न सोडविला.
मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी नुकताच माळशिरस तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जलजीवन मिशनसह, माळशिरस तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या या पाहणीनंतर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क झाली आहे. माळशिरस तालुक्यातील बोंडले, वेळापूर, पानीव, झंजेवाडी, मोटेवाडी या गावांमधील जलजीवन मिशनच्या कामांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर माळशिरस पंचायत समितीमध्ये पाहणी केली. पाणीव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेट देऊन इमारतीचे काम गुणवत्ता पूर्ण होत असल्याची खात्री केली. इमारतीचे काम गुणवत्तेचे करा, फेब्रुवारीअखेर पर्यंत हे काम पूर्ण करण्याची सूचना त्यांनी दिली.
वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, प्राथमिक शाळेचही पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली. बोडले येथे अनुसूचित जाती नवबौध्द घटकांसाठी सुरू असलेल्या विकास कामांचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्यासह विभाग प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणेचा घेतला अंदाज
सीईओ आव्हाळे यांनी माळशिरस दौऱ्यात वेळापूर, पानीवसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची पाहणी केली. औषध भांडार, ऑनलाइन औषध प्रणाली व सर्व रजिस्टरची स्वतः खातर जमा करून औषधसाठा तपासला. बाह्यरुग्ण तपासणी विभाग, प्रसुतीगृह, ऑपरेशन थिएटर व शौचालये, परिसर, निवासस्थाने यांना भेट देऊन पाहणी केली. आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना शिबिराच्या ठिकाणी भेट देऊन लाभार्थींना त्यांनी कार्ड वाटप केले. नव्याने बांधकाम होत असलेल्या पाणीव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. मोटेवाडी आरोग्य उपकेंद्रालाही त्यांनी भेट दिली. माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागाचा अंदाज सीईओ आव्हाळे यांनी घेतला. माळशिरसनंतर आता कोणत्या तालुक्याची तपासणी होणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.