सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांना सरपंच परिषदेने ‘उत्तम प्रशासक” म्हणून सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी आतापर्यंत केलेल्या सेवेची दखल घेऊन हा सन्मान केला आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, आमदार अभिमन्यू पवार, आमदार कृष्णा गजबे, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थित झालेल्या शानदार कार्यक्रमात शेळकंदे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शेळकंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून ग्रामीण भागातील जनतेला विकास योजनेचा लाभ दिला. पंढरपूर येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्तीस असताना आषाढी एकादशीच्या वेळेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी चांगले नियोजन केले. त्यांच्या अशा विविध कामाची दखल घेऊन ‘ उत्तम प्रशासक” म्हणून सरपंच परिषदेने हा गौरव केला आहे.
त्यांच्या या सन्मानाबद्दल मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव यांनी अभिनंदन केले.
शालेय जीवनापासूनच नवनवीन विषयांचा आढावा घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून काटेकोर पद्धतीने नियोजन करून जीवनामध्ये यशस्वीतेचा मंत्र जपणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण लौकिक प्राप्त केलेला आहे. विद्यार्थी दशेपासूनच आपण प्रशासकीय सेवेचा ध्यास घेतलेला असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदी आपली निवड झाली परीविक्षाधिन असतानाच जिल्हा परिषद भंडारा येथे आपण अत्यंत उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
तसेच गट विकास अधिकारी श्रेणी १, पंचायत समिती कार्यालय पंढरपूर येथे कार्यरत असताना सन २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करून महाराष्ट्र राज्यातून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाबरोबरच आषाढी वारी मध्ये अत्यंत नियोजनबद्ध आणि आपत्ती व्यवस्थापना मध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडून आपणास गौरवण्यात आले आहे.. त्यानंतर राहुरी येथे गटविकास अधिकारी म्हणून काम करताना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करून सन २०१५-२०१६ मध्ये यशवंत पंचायत राज पुरस्कार राज्यस्तरीय तृतीय क्रमांक आणि २०१६-२०१७ मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज पुरस्कार प्रथम क्रमांकाने मानांकन मिळवले आहे. आपण माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण काम करून सन २०२० मध्ये पिंपळगाव बसवंत ता. निफाड जि. नाशिक हे गाव राज्यात प्रथम क्रमांकावर येऊन एक कोटी रुपये पारितोषिक व सन्मानपत्र प्राप्त केले आहे.