सांगोला तालुक्यातील कोळा या गावी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिविहार व अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या स्मारकाचे विशेष म्हणजे…. याला सर्व निधी हा सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून दिला गेलाय, सुमारे 2 कोटींपर्यंत निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या काळापासून हे सुरू आहे, कोळा गटाचे जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांचा पाठपुरावा आणि प्रयत्न राहिला आहे, केवळ त्यांचेच कष्ट या स्मारकासाठी आहेत, तसेच अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी ही हा निधी देण्यात मोठा वाटा उचलला, येत्या रविवारी दुपारी हा भूमिपूजन सोहळा अध्यक्ष कांबळे यांच्या हस्ते व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पत्रिकेत सन्मान देणे अपेक्षित होते, मात्र सचिन देशमुख यांनी आपले आमदार शहाजी पाटील, दीपक साळुंखे, तहसीलदार अभिजीत पाटील, चंद्रकांत देशमुख, झेडपी विरोधी पक्षनेते काका साठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची नावे वरच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून घातली आहेत, आणि उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, इतर सर्व सभापती, विभाग प्रमुख यांची नावे खाली टाकण्यात आली आहेत. यामध्ये झेडपी मधील झालेले सहकार्य न पाहता आपल्या तालुक्यातील लोकांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केल्याचे दिसून येते. या पत्रिकेवरून सध्या झेडपीत वाद ऐकण्यास मिळाला, अनेक सभापती कार्यक्रमाला न जाण्याची भूमिकेत आहेत, भाजपच्या जिल्हाध्यक्ष, अतिरिक्त सीईओ, वर आणि आम्ही खाली हे शोभते का असा सवाल उपस्थित केला गेला. या कार्यक्रमाच्या निमंत्रणाची जबाबदारी सचिन देशमुख यांनी समाज कल्याण सभापतींचे पती संगम धांडोरे यांच्यावर सोपवली होती मात्र त्यांनी मीडियाच्या कुणालाही साधी पत्रिका सुध्दा दिली नाही, एकूणच नियोजना मध्ये ही सुसूत्रता नाही असे चित्र आहे.