कृषी उपसंचालक तथा प्रभारी सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांची बदली झाली असून त्यांना कृषी उपसंचालक, यापदावर अहमदनगर जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे. तत्कालीन कृषी अधिकारी बसवराज बिराजदार हे सेवा निवृत्त झाल्यानंतर कृषी उपसंचालक पदावर असणारे रविंद्र माने यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या पत्नी सुवर्णा माने या वन विभागात मोठ्या पदावर असल्याने आणि त्यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात झाली होती, त्यामुळे माने यांना नगर जिल्हा देण्यात आला आहे. मात्र माने यांच्या जागेवर दुसरा अधिकारी दिला गेला नाही.
तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या काळात जलयुक्त शिवार अभियान राबवताना अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक या पदावर रवींद्र माने यांनी उत्कृष्ट काम केले आहे. या अभियानात झोकून देऊन काम केल्याने मुंढे यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, कृषी विभागात अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून ही त्यांच्याकडे पाहिले जाते. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानात सोलापूर जिल्हयाला राज्यात पहिला क्रमांक मिळाला होता.



















