दक्षिण सोलापूर मतदारसंघात लिंगायत समाज व धनगर समाजाचे प्राबल्य आहे. आनंदराव देवकते यांच्यानंतर हा मतदारसंघ स्थानिक नेत्यांच्या हातून सुटला, तरीही तालुक्यात काँग्रेस पक्षाला ग्रामिणमध्ये जनाधार असल्याने अनेक इच्छुकांचा ओढा सध्या काँग्रेसकडून दक्षिण मतदार संघाकडे वाढला आहे.
भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक असलेला एक लिंगायत समाजाचा नेता आता काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहे. ते आहेत महादेव कोणगुरे. महादेव कोनगुरे हे सोलापूरचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर महाराज यांचे अतिशय जवळचे असून त्यांचे शिष्य मानले जातात, आमदार विजयकुमार देशमुखांच्या ते कायम संपर्कात असतात, ते लिंगायत समाजाचे असून महाराज स्वतः उमेदवार असल्याने खासदारकीच्या निवडणुकीत त्यांचा महत्वाचा रोल राहिला होता,
ते प्रसिद्ध अशा सागर सिमेंट या कंपनीचे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याचे मॅनेजर आहेत. मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीवर सदस्य आहेत. त्यांचे एम के फाउंडेशन आहे त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे, सर्वसामान्यांच्या मदतीला ते धावून जातात, अनेक सामाजिक उपक्रम गरजू यांच्यासाठी त्यांनी राबविले आहेत. ते सध्या विजापूर रोड वरील पनाश या मोठ्या अपार्टमेंट मध्ये राहत आहेत.
मागील काही दिवसांपासून कोनगुरे हे काँग्रेस पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती, त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या भेटी घेतल्या होत्या,
दरम्यान गणेशोत्सव निमित्ताने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील या सर्व नेत्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते आणि “पनाश”चे व्यवस्थापक सागर शहा यांनी पनाश अपार्टमेंटमधील श्री गणेश उत्सवानिमित्त पूजेसाठी नेले होते त्याठिकाणी पूजेनंतर ही सर्व नेतेमंडळी महादेव कोनगुरे यांच्या निवासस्थानी चहाला गेली त्या ठिकाणी गप्पा गोष्टी झाल्या, चहापानानंतर सुधीर खरटमल आणि प्रकाश वाले यांनी महादेव कोनगुरे यांना आता लवकरच भेटू असे सूचक वक्तव्य केले.
या चहापान कार्यक्रमा मागे निश्चितच कोणगुरे यांना काँग्रेस पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोनगुरे हे मोठ्या कंपनीमध्ये दोन राज्याचे प्रमुख असल्याने तसेच त्यांचं सामाजिक कार्य आणि लिंगायत समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा पाहता काँग्रेस पक्षाला निश्चितच या नेत्याचा आगामी निवडणुका मध्ये उपयोग होऊ शकतो. दक्षिण सोलापूर मतदार संघामध्ये महादेव कोनगुरे यांच्यासाठी भविष्यात काँग्रेस निश्चित विचार करेल अशी ही चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकण्यास मिळत आहे. 24 सप्टेंबर दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोलापूर दौऱ्याची शक्यता असून त्या दौऱ्यात कोनगुरे यांचा प्रवेश होणार का?अशी ही चर्चा आहे.