सोलापूर : सोलापुरातील चाकोते घराणे….स्वर्गीय सहकार महर्षी बाबुराव चाकोते…., कायम सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी, कामगार यांच्यासाठीच आयुष्य वेचले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून हजारो कामगारांना कामाला लागले, हजारो व्यापारी झाले, शरद सूत मिलच्या माध्यमातून शेकडो हातांना काम दिले. आजही बाजार समितीतील अनेक लोकांच्या घरात देवासोबत बाबुराव चाकोते यांचा फोटो दिसतो.
एक वेळ अशी होती चाकोते घराण्याकडे आमदारकी, बाजार समिती सभापतीपद, महापालिकेत पद होते आज अवस्था पाहिली तर सत्तेतील कोणतेही पद नाही. ज्या बाजार समितीची स्थापना स्वर्गीय बाबुराव चाकोते यांनी केली त्यातच सध्या चाकोते घराण्यातील एका ही सदस्याचा समावेश नाही. जे आहे ते केवळ सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक पद आणि सुदीप चाकोते यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पद. पण ते पद सुदीप यांनी स्वतःच्या हिम्मतीवर मिळवले आहे.
आज राजकारणात चाकोते घराण्यातील तिसरी पिढी काम करत आहेत मात्र ही तिसरी पिढी समाजकार्य सोडून पूर्ण व्यवसायाला वाहून घेतलेली दिसते. टोटली कमर्शिअल वृत्ती दिसते. सोलापूर शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर तळे हिप्परगा या गावी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचे चिरंजीव विश्वराज चाकोते यांनी शॉवर अंड टॉवर हे वॉटर पार्क काढले आहे. वॉटर पार्कमध्ये लहान मुलांना सुद्धा 700 आणि त्या मुलाची उंची चार फूट आहे त्यांना एक हजार रुपये तिकीट ठेवण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेमध्ये तिकिटाचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता चाकोते यांनी पंधरा कोटी रुपये खर्चून हा प्रोजेक्ट काढला आहे ते लोन कसे फेडणार असे उत्तर दिले. मुळात सोलापुरात विडी कामगार, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार, घरेलू कामगार, हमाल माथाडी कामगार यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वॉटर पार्क म्हणले की, लहान मुलांना जास्त आकर्षण, त्यामुळे मुलांची संख्या या पार्कला जास्त असते परंतु सर्वसामान्यांची मुलं जायचे म्हटले तर एक हजार रुपये तिकीट जास्त असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ज्या बाबुराव अण्णांनी कष्टकरी दीनदलितांच्या मुलांसाठी कार्य केले. आज जर स्वर्गीय बाबुराव चाकोते हे हयात असते तर त्यांना हे निश्चितच आवडले नसते.
एकाच वाटर पार्कचे किती वेळा उद्घाटन होणार? यापूर्वी एका स्वामींच्या हस्ते या पार्कचे उद्घाटन करण्यात आले होते त्यानंतर देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पार्कमध्ये दोन वेळा कार्यक्रम झाले आहेत, त्यांनाही हे पार्क फिरवून दाखवण्यात आले आहे. त्याच्या बातम्या झाल्या, आता पावसाळा केवळ वीस दिवसावर आला असताना सिने अभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते वॉटर पार्कचे उद्घाटन करण्याचा फार्स का? असा प्रश्न आता सोलापूर शहरात उपस्थित होऊ लागला आहे.

















