



भाजपच्या कसबा गडाला काँग्रेसचा सुरुंग ; गोदावरी मोकाशी देणार धक्का
सोलापूर : सोलापुरात अनेक भाग हे भारतीय जनता पार्टीचे गड म्हणून संबोधले जातात. त्यापैकी एक म्हणजे उत्तर कसबा. या भागात असलेल्या लिंगायत समाजाचे प्राबल्य. हा समाज कायमच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहिला आहे.
या महापालिकेच्या निवडणुकीत मात्र भाजपच्या या गडाला तडा जाण्याची शक्यता आहे. या भागातील लिंगायत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गुरुशांत मोकाशी यांच्या पत्नी गोदावरी मोकाशी या काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक आठ मध्ये निवडणूक लढवत आहेत.
यंदा लिंगायत समाजातून बदलाचे वारे वाहत आहे. इथल्या स्थानिक नेतृत्वावर असलेली नाराजी ही या निवडणुकीतून दिसून येईल असेही खाजगीत बोलले जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे, रुग्णसेवक म्हणून ओळख असलेले गुरु मोकाशी यांनी भाजप समोर चांगलेच आव्हान उभे केले आहे.
मानाचा कसबा गणपतीच्या उत्सव अध्यक्ष पद स्वीकारणारे मोकाशी यांची समाजासह या परिसरात एक चांगली ओळख आहे. मोकाशी यांनी कोरोना महामारी मध्ये केलेले काम सर्व सोलापूरकरांनी पाहिले, स्वतःच्या जीवाची परवा न करता अनेकांच्या मदतीला गुरु धावून गेला होता. मोकाशी कुटुंबाची हीच जमेची बाजू आहे.
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गुरु मोकाशी यांनी अपक्ष उमेदवारी लढताना माजी महापौर पेक्षा अधिक मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. यंदा खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा या भागात घेतलेल्या रॅलीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
या महाविकास आघाडीच्या पॅनल मध्ये सोबतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते शेरू कुरेशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मेघा संदीप बेळणकर आणि शिवसेनेचेच शशिकांत बिराजदार हे चार उमेदवार आहेत.
प्रत्येकांची आपापल्या भागात चांगली ओळख असल्याने हे पॅनल अतिशय स्ट्रॉंग समजले जाते. या निवडणुकीत निश्चितच प्रभाग क्रमांक आठमध्ये भाजपच्या गडाला तडे जाणार असल्याची जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे.





















